अजंठानगर परिसरात मध्यरात्री कारवाई; जिवंत काडतुसेही जप्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
निगडी पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत तडीपार असलेल्या सराईत आरोपीला देशी गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसेसह अटक केली आहे. आरोपीवर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आलेली असतानाही तो विनापरवाना शहरात वावरत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
ही कारवाई दि. ८ मे २०२६ रोजी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथील सार्वजनिक शासकीय आयटीआय जवळ करण्यात आली.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विकास जर्नादन रेड्डी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी करण उर्फ राजू ज्ञानदेव तिरकर (वय २३, रा. जय मल्हार हौसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून ५१ हजार ५०० रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा आणि १ हजार ५०० रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वीच तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले. मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१ यांनी आदेश क्रमांक ०४/२०२६ अन्वये आरोपीला पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र कोणतीही अधिकृत परवानगी न घेता आरोपी शहरात फिरत असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ आणि १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पराळे करीत आहेत.


