शबनम न्यूज | प्रतिनिधी
कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त आझाद रिक्षा चालक संघटनातर्फे ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने व सेवाभावी वृत्तीने रिक्षा व्यवसाय करत प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह सेवा देणाऱ्या ज्येष्ठ रिक्षा चालकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विष्णू ताम्हाणे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे, रिक्षा संघटनेचे ज्येष्ठ सहकारी तसेच विद्यार्थी वाहतूक संघटनेचे श्री. बापू भावे तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भारतातील पहिली महिला रिक्षा चालक सौ. शीला डावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ रिक्षा चालकांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अनेक वर्षे रिक्षा व्यवसायात योगदान देत शहराच्या वाहतूक व्यवस्थेला भक्कम आधार देणाऱ्या ज्येष्ठ रिक्षा चालकांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ रिक्षा चालकांच्या प्रामाणिक सेवेचे कौतुक करत त्यांच्या कष्टमय व सेवाभावी कार्याला सलाम केला. सहाय्यक पोलीस आयुक्त व आयर्न मॅन श्री. विष्णू ताम्हाणे यांनी रिक्षा चालक हे शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून त्यांनी शिस्त, प्रवासी सुरक्षा व सामाजिक जबाबदारी जपत सेवा देणे आवश्यक असल्याचे यासोबत कित्येक रिक्षा चालक हे काही ना काही व्यसन करीत असतात परंतु रिक्षा चालकांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपलले आरोग्य जपावे, व्यायाम करून, चालून स्वतःचे शरीराची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. गरज पडल्यास मी व माझे कोच याबाबत रिक्षा चालकांना मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहोत असे सांगितले. यावेळी आयर्न मॅन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेले त्यांची चिरंजीव गौरांग ताम्हाणे तसेच कोच विजय गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते. तसेच कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे म्हणाले की कित्येक वेळा अपघातामध्ये जखमी व्यक्तींना वेळेवर औषधोपचार मिळणे हे अतिशय महत्त्वाचे असते आणि रिक्षा चालकांमुळे कित्येक जखमी नागरिकांचा जीव वाचला आहे, रिक्षा चालक हा पोलीस प्रशासनासाठी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे असे मत व्यक्त केले .
सहायक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे (आयर्न मॅन ) यांनी यावेळी रिक्षा चालक यांना आरोग्यासाठी 7 जून रोजी पुणे पोलीसद्वारा आयोजित वृक्षाथॉन मध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात शफिक भाई पटेल यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या माध्यमातून आज पर्यंत केलेल्या कार्यांची माहिती सादर केली तसेच रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासन दिले. तर संघटनेचे उपाध्यक्ष मधुकर यादव यांनी ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्यामुळे ज्येष्ठ रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या दीर्घ सेवेला मिळालेली ही मानाची पावती असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास रिक्षा चालक, संघटनेचे पदाधिकारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



