शिरगाव पोलिसांची धाड; सुमारे २.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, महिला आरोपी फरार
प्रतिनिधी – युनूस खतीब | मावळ
मावळ तालुक्यातील शिरगाव परिसरात पवना नदीकाठावर सुरू असलेला गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ८ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन जप्त करण्यात आले असून याची अंदाजे किंमत २ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरगाव गावाच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी एक महिला आरोपी बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुळमिश्रित रसायन भिजवत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून अंदाजे ८,००० लिटर रसायन (प्रत्येकी ३५ लिटरच्या प्रमाणात) जप्त केले. मात्र कारवाईदरम्यान महिला आरोपी घटनास्थळावरून पसार झाली असून तिचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी शिरगाव (परंदवडी) पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. ३ मे २०२६ रोजी रात्री १०.५१ वाजता नोंदवण्यात आला.
या कारवाईचा पुढील तपास पोलीस हवालदार गिरीगोसावी करीत असून फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



