शबनम न्यूज | प्रतिनिधी
१ मे, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने संत तुकाराम नगर , पिंपरी, पुणे येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. श्रमिकांचे कष्ट, त्याग आणि संघर्ष यामुळेच भारत देशाचा विकास झाला असून त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असे गौरवोद्गार कामगार नेते व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव भोसले यांनी काढले.
राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य प्रणित भाजपा च्या वतीने तसेच संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार व महाराष्ट्र दिना निमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात श्रमिकांविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण केली.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करून करण्यात आली. संपूर्ण परिसर देशभक्ती आणि श्रमिकांविषयी आदराच्या भावनेने भारावून गेला होता. यावेळी मनोगत व्यक्त करताना यशवंत भाऊ भोसले यांनी अत्यंत भावनिक शब्दांत श्रमिकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा सर्वात मोठे बलिदान हे श्रमिकांचेच दिसून येईल,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शहरांच्या उभारणीत, उद्योगांच्या प्रगतीत आणि देशाच्या विकासात श्रमिकांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक इमारतीच्या पायाभरणीपासून ते विकासाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत त्यांचा घाम आणि त्याग दडलेला आहे. मात्र, त्यांच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. “श्रमिकांच्या हक्कासाठी आवाज उठवताना त्यांच्या संघर्षामागील मेहनत आणि त्याग कधीच खचून देत नाही,” असे सांगत त्यांनी श्रमिकांच्या जिद्दीचे कौतुक केले, दिवसेंदिवस संघटित कामगार कमी होत असून असंघटित कामगारांचे प्रमुख प्रमाण वाढत असल्याने समाजात आर्थिक दरी ही भविष्यात वाढत जाणार आहे, त्यामुळे रोजगाराबरोबरच छोट्या उद्योगांवर देखील परिणाम होतील अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत श्रमिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए प्रकल्पांमुळे लाखो श्रमिकांना राहण्यासाठी घरे उपलब्ध झाली असून यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले. तसेच, श्रमिकांच्या न्याय हक्कांच्या संरक्षणासाठी आणखी सक्षम व मूलभूत कायद्यांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली श्रमिकांना न्याय मिळवण्यासाठी बळ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे श्रमिकांना हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.
या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, युनियन प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकरराव शितोळे, जयदेव अक्कलकोट (चाकण उद्योजक संघटना अध्यक्ष), दीपक पाटील, दिनेश पाटील, ओमकार जोकारे, अंकुश वाघमारे, लताताई पाटील, अमोल घोरपडे, दत्तात्रय गायकवाड, कैलास गव्हाणे, शिरीष सासवडे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कामगार माता-भगिनींना अल्पोपहार देऊन सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. या उपक्रमातून आयोजकांनी श्रमिकांविषयी आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली.
हा मेळावा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर श्रमिकांच्या कष्टांना दिलेला एक भावनिक सलाम होता. त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबात महाराष्ट्राच्या प्रगतीचे स्वप्न दडलेले आहे, याची जाणीव या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना झाली.




