spot_img
spot_img
spot_img

आदर्शांचे अनुकरण भारताला विश्वगुरू पदाला नेणारे! – डाॅ. सागर देशपांडे

शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘भाषा, संस्कृती, अर्थकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांतील आदर्शांचा शोध घेऊन त्यांचे अनुकरण भारताला विश्वगुरू पदाला नेणारे आहे!’ असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘आदर्शांच्या शोधात’ या विषयावरील चौथे पुष्प गुंफताना डॉ. सागर देशपांडे बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे अध्यक्षस्थानी होते; तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मारुती भापकर यांनी, ‘जिजाऊ व्याख्यानमाला ही पिंपरी – चिंचवडमधील एक अग्रगण्य व्याख्यानमाला असून पस्तीस वर्षांपासून सातत्याने लोकप्रबोधनाचे कार्य करीत आहे; पण समाजाची वैचारिक दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे!’ अशी खंत व्यक्त केली. नरेंद्र पेंडसे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांना आदर्श मानले होते. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या जीवनात किमान एकतरी आदर्श शोधला पाहिजे!’ असे मत व्यक्त केले.
डॉ. सागर देशपांडे पुढे म्हणाले की, ‘समाजात केवळ दहा टक्के लोक प्रामाणिकपणे काम करतात, हे अनादि काळापासूनचे सत्य आहे. अर्थातच कोणत्याही राजकीय पक्षाला त्यासाठी पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही. ‘ज्यांचे पाय धरावेत अशी माणसे आता दिसत नाहीत’ असे पु. ल. देशपांडे विनोदाने म्हटले असले तरी आपली पूर्वग्रहदूषित दृष्टी बाजूला सारून  आपल्या सभोवताली शोध घेतल्यावर अनेक आदर्श व्यक्तिमत्त्व आढळून येतात. छत्रपती शिवाजीमहाराज यांनी पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत जी काही देदीप्यमान कर्तबगारी केली आहे, ती समजून घेण्यात आपला एक जन्म अपुरा पडेल. केवळ आपल्या देशातीलच नव्हेतर जगातील असंख्य प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांनी शिवचरित्रापासून प्रेरणा घेतली आहे. आपण कृष्ण विसरलो, गीता विसरलो आणि आता छत्रपती शिवाजीमहाराजही विसरत चाललो आहोत. शिवाजीमहाराज नेपोलियनपेक्षाही महा पराक्रमी होते, ही बाब जगातील अभ्यासक नमूद करतात; पण त्यांच्या कितीतरी पटीने नेपोलियनची चरित्रे लिहिली गेली आहेत. याचे कारण आपण आपला जाज्वल्य इतिहास जाणून घेतला नाही. आपण संस्कृत भाषा विसरलो आणि आता मायबोली मराठीविषयी आपल्याला आपुलकी वाटत नाही. वास्तविक जगात पंधरा कोटी लोक मराठी बोलतात. मराठीत सातशे ज्ञानकोश आहेत. दरवर्षी सातशे दिवाळी अंक आणि तीन हजार पुस्तकं मराठीत प्रसिद्ध होतात. आपला भारत देश खंडप्राय असून बावीस राज्यघटनेतील भाषा आणि सोळाशे बोलीभाषा बोलल्या जातात. आपल्या प्रत्येक प्रथापरंपरांमागे विज्ञान आहे. आपल्या पुण्याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून संबोधण्यात येते; पण या गोष्टीचा आपल्याला स्वाभिमान वाटत नाही. माझ्या सुदैवाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांचा सहवास आणि चरित्रलेखन करण्याची संधी मला लाभली; तसेच ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचा सहवास लाभला!’ ओघवत्या अन् मार्मिक शैलीतून डाॅ. सागर देशपांडे यांनी विषयाची मांडणी केली.
ॲड. विपुल नेवाळे, महेश गावडे, अवधूत कुलकर्णी, अशोक कामेरकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुदाम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!