spot_img
spot_img
spot_img

अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे! – ॲड. नीलिमा गोखले

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे असून त्यामुळे विवाहसंस्था धोक्यात आलेली आहे!’ असे विचार अखिल भारतीय अधिवक्ता परिषद पुणे जिल्हा अध्यक्षा ॲड. नीलिमा गोखले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड जिल्हा आयोजित अधिवक्ता महिला संमेलनात ‘सद्य:स्थितीतील वाढत्या घटस्फोटांची मीमांसा’ या विषयावर मार्गदर्शन करताना ॲड. नीलिमा गोखले बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, ज्येष्ठ समुपदेशिका शिवलीला पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे, ॲड. अंतरा देशपांडे, अधिवक्ता परिषद महामंत्री ॲड. संतोष गुरव, ॲड. अमेय पिंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी – चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. नीलिमा गोखले पुढे म्हणाल्या की, ‘स्री सुशिक्षित अन् आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली असतानाही पुण्यात महिन्याला शंभर ते दीडशे महिला घटस्फोट घेतात. जास्त पोटगीसाठी आग्रह धरतात. पुणे परिसरात आय. टी. इंडस्ट्रीज विकसित झालेली असल्याने त्यात काम करून भरघोस पगार घेणाऱ्या मुली आईवडिलांना अनभिज्ञ ठेवून परस्पर विवाह करतात आणि अल्पावधीतच नवर्‍याने टीव्हीचे चॅनल बदलले हे क्रौर्याचे कारण सांगून घटस्फोटाचा आग्रह धरतात. वास्तविक हिंदू विवाह कायद्यात वैध मानलेली घटस्फोटाची कारणे नमूद केली असतानाही घरगुती हिंसा, विभक्तीकरण, व्यभिचार अथवा विवाहबाह्य संबंधांची तकलादू कारणे दाखवून घटस्फोट मागतात. हिंदू विवाह कायद्यातील ४९८ या कलमात बदल व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे; कारण त्यामुळे घटस्फोटाच्या खटल्यात तडजोड होत नाही; उलट ते पैसे उकळण्याचे साधन झाले आहे. वास्तविक पती – पत्नीच्या नात्यात छोटे छोटे खटके उडत असतात; पण त्याची परिणती थेट घटस्फोटात व्हायला नको. निव्वळ प्रजनन करणे ही आपली संस्कृती नसून विवाह हे पवित्र नाते आहे. यासाठी नवविवाहित तरुणींचे समुपदेशन करणे अत्यंत आवश्यक आहे!’ असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. शिवलीला पाटील यांनी ‘प्राचीन भारतातील महिलांचे योगदान व सद्य:स्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई यांचे संदर्भ उद्धृत करीत नारीशक्तीची महती अधोरेखित केली. ॲड. ज्योती पांडे यांनी सादर केलेल्या सांघिक गीताने आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ॲड. सुरेखा डिंभळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ॲड. अंतरा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. सुमिता दौंडकर यांनी अधिवक्ता परिषदेच्या विविध आयामांची माहिती दिली. समारोप सत्रात नरेंद्र पेंडसे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेची माहिती दिली. ॲड. श्वेता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. प्रणिता कुलकर्णी आणि ॲड. बोधनी यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!