शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार की नाहीत? या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून (ठाकरे) अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सहमती मिळाल्यास दानवे हे विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राहणार आहेत.
शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार नाहीत. याआधी चर्चा होती की, विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार. परंतु ऐनवेळी विधान परिषद उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस असताना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने जर उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नावाचा विचार केला तर काँग्रेस उमेदवार उतरवेल असं काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते. त्यामुळे आता काँग्रेससुद्धा उमेदवार देणार का ही बाब महत्वाची मानली जात आहे. काँग्रेसने उमेदवार दिल्यास या निवडणुकीत चुरस निर्माण होईल. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर जावे असा आग्रह धरण्यात आला होता. मात्र उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्यालाही पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
अंबादास दानवे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. आता त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून ते विधानपरिषदेचे उमेदवार असतील. पण मविआतील घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे बघावं लागेल. काँग्रेसने ठाकरेंशिवाय दुसरा उमेदवार दिल्यास आम्ही उमेदवार देणार अशी भूमिका घेतली होती.




