शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यातील रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबेर चालकांसाठी परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परप्रांतीय आणि हिंदी भाषिक चालकांना मराठी भाषेचे ज्ञान व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने एका विशेष ‘माहिती पुस्तिकेचे’ प्रकाशन केले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.१ मे पासून राज्यातील सर्व आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये या पुस्तिकेचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी कोकण साहित्य परिषद आणि मराठी साहित्य संघाने परिवहन विभागाकडे एक प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार, रस्ते वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चालकांना दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करता यावा, यासाठी आवश्यक मार्गदर्शक माहिती या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.
हिंदी भाषिक चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी राज्यातील विविध संघटनांनी केली होती. ही मागणी मान्य करत सरकारने चालकांना मराठी आत्मसात करण्यासाठी वाढीव वेळ दिला. मात्र, ही मुदतवाढ देतानाच मंत्री सरनाईक यांनी संघटनांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, “जर तुम्ही हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी वेळ मागत असाल, तर आता तुमची जबाबदारी अधिक वाढली आहे.”
१ मे (महाराष्ट्र दिन) पासून १५ मे पर्यंत ही पुस्तिका सर्व आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून दिली जाईल. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ आरटीओ अधिकाऱ्यांची नसून, ती विविध रिक्षा-टॅक्सी युनियन, संघटना आणि सामान्य मराठी नागरिकांची देखील आहे.




