पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब
मावळ तालुक्यातील दाब्रे गाव परिसरात तडीपार आदेशाचा भंग करून वावरत असलेल्या आरोपीला गावठी पिस्तूलासह अटक करण्यात आली आहे. म्हसोबा मंदिरासमोर, दारणे–चांदखेड रोडवर २८ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस हवालदार रितेश कोळी यांनी फिर्याद दिली असून अनंता उर्फ ओंकार संताजी सोरटे (वय २२, रा. लोहर वस्ती, दाब्रे, ता. मावळ) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वी तडीपार आदेश लागू असतानाही त्याने संबंधित हद्दीत विनापरवानगी प्रवेश केला होता. तसेच त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण २८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.




