पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब
मोशी परिसरात एका अल्पवयीनाकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कुदळेवस्ती येथील पाण्याच्या टाकीजवळ २७ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.५५ वाजता हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार विजय दौंडकर यांनी फिर्याद दिली असून संबंधित विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीनाकडे सुमारे ५१ हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस विनापरवाना आढळले. तसेच आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याचेही निष्पन्न झाले.
या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर करीत आहेत.




