spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून महाराष्ट्र दिनानिमित्त ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी भव्य सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कीर्ती सोहळा प्रतिष्ठान आयोजित आणि पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे ऐतिहासिक महानाट्य ‘जाणता राजा’ सादर करण्यात येणार आहे. निगडी, सेक्टर २५ येथील मदनलाल धिंग्रा मैदानात ‘जाणता राजा’ हे महानाट्य दि. १ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे असणार आहेत. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महेश लांडगे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप,शंकर मांडेकर, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याशिवाय शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया गटनेते कुणाल वाव्हळकर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, माजी उपमहापौर तथा नगर सदस्य राजू मिसाळ, शैलजा मोरे, नगरसदस्य अमित गावडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे तसेच नगरसदस्य, नगरसदस्या व अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी माहिती देताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, महाराष्ट्र दिनी या महानाट्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे शौर्य व कार्यापासून प्रेरणा घेवून या पिढीने कार्य करावे यासाठी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.

पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित ‘जाणता राजा’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्यात त्यांच्या शौर्यगाथा, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि मराठी अस्मितेचा अभिमान अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडण्यात आला आहे. भव्य नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा, जिवंत घोडे-हत्ती, आणि शेकडो कलाकारांचा सहभाग यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक उपक्रमातून शहरातील नागरिकांना इतिहासाशी जोडण्याचा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान जागवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे शहरातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, मोठ्या संख्येने नागरिकांनि उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!