शबनम न्यूज | प्रतिनिधी
खिंवसरा पाटील शिक्षण संकुल येथे स्लम सॉकर क्रीडा विकास संस्था, नागपूर यांच्या वतीने मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दि. ३० जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार मासिक पाळी आरोग्य हा विद्यार्थिनींचा मूलभूत हक्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, स्वच्छ व सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच जागरूकता निर्माण करणे आणि सकारात्मक वातावरण तयार करणे आवश्यक ठरते. याच उद्देशातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू शिक्षकांना या विषयाबाबत संवेदनशील, सजग व सक्षम बनवणे हा होता, जेणेकरून ते विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन करू शकतील आणि शाळेमध्ये आरोग्यदायी, सुरक्षित व समंजस वातावरण निर्माण करू शकतील. यासाठी शाळेतील महिला व पुरुष शिक्षकांची निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी सहभागी करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळा अधिक रंजक, प्रभावी व सहभागी स्वरूपाची व्हावी यासाठी विविध खेळ, संवाद सत्रे, गटचर्चा तसेच मासिक पाळीशी संबंधित प्रसंगांवर आधारित नाट्य सादरीकरणाचे उपक्रम घेण्यात आले. महिला व पुरुष शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विषयावरील आपले विचार मांडले. या उपक्रमांमुळे समाजात अनेकदा संकोचाने पाहिल्या जाणाऱ्या विषयावर मोकळेपणाने चर्चा करण्याची सकारात्मक भावना सर्वांमध्ये निर्माण झाली.
या कार्यशाळेसाठी मा. श्री संदेश बोर्डे यांनी पुढाकार घेऊन शाळेशी संपर्क साधला व कार्यशाळेचे आयोजन घडवून आणले. मार्गदर्शक म्हणून मा. सौ. महिमा बारसे, शिबा मार्कस, पुनम देवकाते, अलका रकटे व पूर्णिमा मारोठिया यांनी उपस्थित राहून प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता घोडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सौ. प्रज्ञा फुलपगार, योगेश्वरी महाजन व अश्विनी दळवी यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. प्रीती पाटील व सौ. मनीषा गोसावी या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




