spot_img
spot_img
spot_img

मशरूम युनिटमधील ड्रेनेज टँक ठरला मृत्यूचा सापळा; तिघा परप्रांतीय कामगारांचा गुदमरून मृत्यू

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात रविवारी दुपारी हृदयद्रावक दुर्घटना घडली. बेलसर येथील मशरूम उत्पादन युनिटमधील ड्रेनेज टँकमध्ये उतरलेल्या तिघा परप्रांतीय कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युनिटमधील ड्रेनेज लाईन साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी एका कामगाराने टँकमध्ये प्रवेश केला. मात्र बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने इतर कामगारांनी चिंता व्यक्त केली.

सहकाऱ्याला मदत करण्याच्या हेतूने दुसरा कामगार टँकमध्ये उतरला. त्यानंतर काही क्षणांत तिसऱ्यानेही आत प्रवेश केला. मात्र तिघेही बाहेर न आल्याने एकच खळबळ उडाली.

घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि कामगारांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने ड्रेनेज टँकचा स्लॅब फोडून तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांनाही मृत घोषित केले.

प्राथमिक तपासात टँकमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षा साधनांचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृतांची ओळख पिंटू राजेश प्रसाद (वय २३), व्यास सोहम कुमार (वय २२) आणि गौतम रामसुरन कुशवाहा (वय ३६) अशी झाली असून तिघेही उत्तर प्रदेशातील Deoria जिल्ह्यातील रहिवासी होते.

या प्रकरणी संबंधित यंत्रणेच्या सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!