बंधुभाव, कुटुंब आणि हिंदवी स्वराज्याच्या गाथेची रोमांचक झलक
शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबई मध्ये पार पडण्यात आला असून निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी आणि हिंदी अशा दोन्हीं भाषांमध्ये, अधिकृतरित्या ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेला हा चित्रपट भारतातील सर्वश्रेष्ठ शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. बाळ शिवाजी ते राजा शिवाजी पर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य’ स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज या कार्यक्रमाला जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेता- लेखक रितेश विलासराव देशमुख, तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, जिनिलीया देशमुख आणि संगीतकार जोडी अजय-अतुल उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली.




