पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका तरुण दांपत्याला तब्बल १२ लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात सायबर पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक वडिलांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघडकीस आला आणि मोठा आर्थिक घोटाळा टळला.
निगडी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाला रविवारी सकाळी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. संबंधिताने स्वतःला मुंबई पोलीस क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगत, तरुणाच्या नावाने पाठविलेले पार्सल पकडण्यात आल्याचे सांगितले. त्या पार्सलमध्ये पाच बनावट पासपोर्ट आणि एमडी ड्रग्ज सापडल्याचा बनाव रचण्यात आला.
यानंतर तरुण व त्याच्या पत्नीला ‘सिग्नल’ अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडून व्हिडिओ कॉलवर ठेवण्यात आले. समोर पोलीस गणवेशातील बनावट अधिकारी दिसत होते. “तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात, चौकशी पूर्ण होईपर्यंत कॉल कट करू नका,” अशी धमकी देत दांपत्याला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले.
सायबर गुन्हेगारांनी दांपत्याकडून बँक खाते, आधार कार्ड व आर्थिक माहिती मिळवली. तसेच खात्यातील रक्कम पाठविण्यास सांगितले. यासाठी तरुणाने आपल्या म्युच्युअल फंडमधून १२ लाख रुपये काढण्याची प्रक्रिया देखील सुरू केली होती.
दरम्यान, तरुणाने मोबाईल दूर ठेवून आपल्या ८१ वर्षीय वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस अंमलदार सोपान बोधवड यांनी वरिष्ठांना कळवून तात्काळ पथकासह तरुणाच्या घरी धाव घेतली.
पोलीस अंमलदार सोपान बोधवड, मुकुंद वारे, तसेच महिला पोलीस अंमलदार स्नेहा म्हस्के यांनी दांपत्याला हा प्रकार ‘डिजिटल अरेस्ट’ नावाच्या सायबर फसवणुकीचा असल्याचे समजावून सांगितले आणि संभाव्य १२ लाखांची फसवणूक रोखली.
दरम्यान, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक व सोसायट्यांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीमुळेच हा प्रकार ओळखता आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
पोलिसांचे आवाहन
‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही कायदेशीर संकल्पना अस्तित्वात नाही. कोणताही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलवरून चौकशी करत नाही. अशा कॉल्सना प्रतिसाद देऊ नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात, सायबर पोलिसांकडे किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी.




