निःपक्षपाती, सचोटीपूर्ण पत्रकारितेबद्दल ‘ग्रिफिन पुरस्कार’ प्रदान
शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्थानिक पत्रकारितेत सत्य, पारदर्शकता आणि निःपक्षपाती भूमिकेमुळे वेगळी ओळख निर्माण केलेले पत्रकार युनूस खतीब यांना पुणे पत्रकार पुरस्कार २०२६ अंतर्गत प्रतिष्ठेचा ग्रिफिन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान कम्युनिटी कनेक्ट आणि लोकशाहीसाठी PAG यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार समारंभ पुण्यातील एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे उत्साहात पार पडला. विविध सामाजिक, पत्रकारिता आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उज्ज्वला बर्वे डोके (संवाद आणि पत्रकारिता विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), नीरज जैन (संस्थापक, लोकायत आणि संविधान जागर समिती) तसेच ॲड. अय्युब शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नवनीत सिंग गांधी (पुणे, सामाजिक कार्यकर्ते) आणि अली भोजानी (मुंबई, सामाजिक कार्यकर्ते) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवनीत सिंग गांधी यांनी विशेष कामगिरी बजावली.
या सोहळ्यात विविध माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये ओमकार वाबळे (मुंबई तक), प्राची कुलकर्णी (BBC News Marathi), मुक्ता कदम (मुक्त पत्रकार), अश्विनी सातव डोके (मुक्त पत्रकार), युनूस खतीब (News One India), प्रतीक्षा जोशी (मुक्त पत्रकार) तसेच कॅथरिन अब्राहम (मुक्त पत्रकार) यांचा समावेश होता.
पुरस्कार पत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे, सत्य, सचोटी आणि निःपक्षपाती पत्रकारितेबद्दल असलेले युनूस खतीब यांचे समर्पण हे ग्रिफिन पुरस्काराच्या भावनेचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले. न्याय, ज्ञान आणि पारदर्शकतेच्या ध्येयासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
युनूस खतीब यांनी स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या, प्रशासनातील घडामोडी तसेच सामाजिक विषय सातत्याने जनतेसमोर मांडत पत्रकारितेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना युनूस खतीब यांनी हा सन्मान जनतेच्या विश्वासाचा आणि जबाबदारीचा मान असल्याची भावना व्यक्त केली. पुढील काळातही सामान्य नागरिकांचे प्रश्न, सत्य आणि समाजहितासाठी पत्रकारिता अधिक जोमाने सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सन्मानामुळे स्थानिक पत्रकारितेतील प्रामाणिक काम करणाऱ्या पत्रकारांना नवे प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




