पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
देहूफाटा परिसरातील एका लॉजवर दिघी पोलिसांनी पहाटे छापा टाकून अनैतिक मानवी तस्करी व वेश्याव्यवसाय प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १९ एप्रिल रोजी पहाटे एकच्या सुमारास Aram Lodge येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार अरुण खंडू डामसे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार गणेश बाबाजी डुंबरे (वय ३२, रा. देहूफाटा, आळंदी) याला अटक करण्यात आली आहे. तर विजय गणेश शेट्टी (रा. देहूफाटा, आळंदी) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला कामाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. तसेच त्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर स्वतःची उपजीविका चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.




