पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
रुपीनगर तळवडे परिसरात एका व्यापाऱ्याला दुकान बंद पाडण्याची, गांजा ठेवून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल ७ लाख ९ हजार ९०० रुपये, मोबाईल फोन आणि सोन्याची अंगठी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका आरोपीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ मार्च २०२५ पासून ते १९ एप्रिल २०२६ पर्यंत रुपी हौसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे येथे घडत होती. याबाबत कैलास भास्कर चौधरी (वय ४७, रा. घरजाई कॉलनी, रुपीनगर तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सचिन उर्फ तानाजी नायकुडे (रा. रुपीनगर तळवडे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अद्याप अटक झालेली नाही.
फिर्यादीकडून एका महिलेने घेतलेले पैसे मला मिळाले नाहीत, ते तू दे, अशी मागणी आरोपीने केली होती. मात्र संबंधित आर्थिक व्यवहार २०१५ मध्येच पूर्ण झाल्याचे फिर्यादीने सांगितल्याने आरोपी संतापला.
त्यानंतर “पैसे दिले नाहीत तर येथे व्यवसाय करू देणार नाही, दुकान बंद पाडेन, दुकानात गांजा ठेवून तुझ्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवीन,” अशी धमकी देत आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी ७ लाख ९ हजार ९०० रुपये उकळले. तसेच Samsung smartphone कंपनीचा मोबाईल फोन आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
इतकेच नव्हे तर आरोपी पुन्हा १ लाख ७० हजार रुपयांची मागणी करत धमक्या देत असल्याने व्यापाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.




