पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
मावळ तालुक्यातील इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये निष्काळजीपणामुळे एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंजलेल्या आणि जुनाट बास्केटबॉल पोल कोसळल्याने हा अपघात घडल्याचा आरोप असून संबंधित प्राचार्य व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. फिर्यादी अशोक बाबुराम वर्मा (वय २७, रा. उत्तरप्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादीचा भाऊ विशाल बाबुराम वर्मा (वय २०) हा इन्स्टिट्यूटच्या ग्राउंडवर व्यायाम करत असताना बास्केटबॉलच्या रिंगला लटकला. त्यावेळी रिंगला जोडलेला लोखंडी खांब अचानक तुटून खाली कोसळला आणि तो थेट विशालच्या डोक्यावर आदळला. या गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात संबंधित बास्केटबॉल पोल हा अत्यंत जुनाट व गंजलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, ग्राउंडवरील साहित्याची वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती न केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी संस्थेचे प्राचार्य संजित कान्गो, ग्राउंड देखभाल कर्मचारी, स्पोर्ट प्रमुख आणि व्यवस्थापक अशा संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करत आहेत.




