spot_img
spot_img
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. नव्या काळांची आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड झालेल्या ‘चितळे बंधू’ आणि राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे,शंकर मांडेकर, इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते.

व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या रहात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, चितळे बंधूंची दूरदृष्टी या सुविधेतून पहायला मिळते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली उत्तम दर्जाची यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे. परदेशी यंत्रांमध्ये अनुभवाच्या आधारे आवश्यक बदल करून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. नूतनीकरणीय ऊर्जेचा उपयोग इथे करण्यात आला आहे.

खाद्यपदार्थांचा दर्जा आणि ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेली गॅलरी हे इथले वैशिष्ट्य आहे. या निरीक्षण गॅलरीमुळे उद्योगात पारदर्शकता येते आणि गुणवत्तेची तपासणीदेखील करता येते. इथून उत्पादनाच्या विविध टप्प्यातील प्रक्रीयेचे अवलोकन करता येते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि वितरकांनाही परदेशाप्रमाणे हा अनुभव व्हिजन पार्कमध्ये औद्योगिक सहलीच्या माध्यमातून घेता येईल. महाराष्ट्रीयन उद्योगाने अशा जागतिक मानकांचे मानकांचे पालन करणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, फूड एक सॉफ्ट पॉवर आहे. चायनीज, जपानी, फ्रेंच,कोरिअन खाद्य पदार्थांचा आस्वाद लोकं घेतात. भारताच्या प्रत्येक भागात वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती पहायला मिळते. ही संस्कृती प्रत्येक १० किलोमीटरवर बदलते. अनेक प्रकारचे चविष्ट व्यंजने आणि पदार्थ यात आहेत. या पारंपरिक पदार्थांना एखाद्या ब्रँडच्या रुपात जगात घेवून जायचे आणि त्यासाठी आवश्यक मानकांचे पालन करण्याचे काम चितळे बंधूनी केले. स्नॅकींगचे चांगले ब्रँडस् चितळे बंधूंनी तयार केले आहेत. परदेशी नागरिक भारतीय पदार्थांकडे आकर्षित होवू लागले आहेत. अशावेळी चितळे यांचे महाराष्ट्रीयन पदार्थदेखील अशाचप्रकारे जगात पोहोचतील आणि लोकप्रिय होतील, असा विश्वास व्यक्त करून शासन म्हणून ‘एक्सपोर्ट ओरिएंटेड’ फूड इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

चार पिढ्यांच्या प्रयत्नातून चितळे हा ग्लोबल ब्रँड झाला असून ३५ देशात ही ओळख पोहोचली आहे. पुणेकरांनी चितळेंच्या उत्पादनावर मनापासून प्रेम केले आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी व्हिजन पार्कला भेट देऊन सुविधांची माहिती घेतली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!