पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ६ कोटी ५३ लाख रुपयांच्या आर्थिक अपहाराचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी ३६ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१३-१४ ते २०१७-१८ या कालावधीत पतसंस्थेचे संचालक आणि संबंधितांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. फिर्यादी सुनिल मथुरा काळे (वय ५५, रा. धनकवडी, पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
तपासात उघड झाल्यानुसार, आरोपींनी विविध प्रकारचे कर्ज व्यवहार आणि ठेवी व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली. सोनेतारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन तारण कर्ज तसेच ठेवतारण व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. तसेच, जमा झालेल्या रकमा रोजच्या हिशोबात न दाखवणे, बँकेत जमा दाखवून प्रत्यक्षात रक्कम न भरणे, बचत खात्यांमधून बनावट सह्या करून पैसे काढणे, बोगस खर्च दाखवणे अशा विविध मार्गांनी निधीचा अपहार करण्यात आला.
याशिवाय, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत गुंतवणूक केल्याचे दाखवले असले तरी त्याबाबत कोणतेही अधिकृत पुरावे उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आले आहे. दैनंदिन हिशोबात फेरफार करून प्रत्यक्ष शिल्लक कमी दाखवणे आणि खोटी आकडेवारी तयार करून आर्थिक गडबड लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या सर्व प्रकारांमुळे पतसंस्थेचे तसेच ठेवीदार, खातेदार आणि सभासद यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकूण ६,५३,९२,०४२ रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) आणि संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून सर्व आरोपी फरार आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत असून या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




