पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत एका तरुणावर सिमेंटच्या ब्लॉकने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संतोषी माता चौक, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. त्यानंतर रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास पवार पेट्रोलपंपजवळील बालाजी ट्रेडर्स दुकानासमोर पुन्हा हल्ला करण्यात आला.
या प्रकरणी दानिश आरिफ शेख (वय १८, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी शहाबाज उर्फ टिपु शहा (वय ३०), इर्रशाद शहा (वय ३२), सुरज उर्फ आसीफ शेख (वय २१) आणि रामा चौधरी (वय २५) यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.
घटनेदरम्यान आरोपींनी प्रथम फिर्यादीचे नातेवाईक फरहान अकबर खान यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर काही वेळातच आरोपींनी पुन्हा एकत्र येत फिर्यादी व त्यांच्या वडिलांवर हल्ला चढवला. आरोपी इर्रशाद शहा याने फिर्यादीस पकडून खाली पाडले, तर मुख्य आरोपी शहाबाज उर्फ टिपु शहा याने रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून “इसको अब खत्म कर देंगे” अशी धमकी देत फिर्यादीच्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९, ११५, ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी क्रमांक ३ व ४ यांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडे करत आहेत.




