spot_img
spot_img
spot_img

धारदार कोयता घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात; चाकण उत्तर पोलिसांची तत्पर कारवाई

पेट्रोलिंगदरम्यान संशयित हालचालींवर कारवाई; आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी (युनूस खतीब)

चाकण परिसरात धारदार शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला चाकण उत्तर पोलिसांनी अटक करत संभाव्य गुन्हा उधळून लावला आहे. ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकण गाव हद्दीत पीडब्ल्यूडी ग्राउंड परिसरात नियमित पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. मार्केट यार्ड समोरील मोकळ्या जागेत एक इसम संशयास्पद हालचाली करत फिरत असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.

घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी संबंधित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचे नाव समाधान उर्फ सोन्या सुरेश अवताडे (वय २१, रा. खंडोबा माळ, चाकण) असे निष्पन्न झाले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

सदर कोयता बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७(१)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, योगेश कोळेकर, महेश कोळी, शिवाजी लोखंडे व सुमित जगझाप यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या घटनेमुळे परिसरात गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत झाली असून पुढील तपास चाकण उत्तर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!