पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
हिंजवडी आयटी पार्क परिसरात नोकरी व प्रोजेक्ट देण्याचे आमिष दाखवत तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशिक्षण देऊन काम करून घेतल्यानंतरही नोकरी अथवा प्रोजेक्ट न देता तब्बल ७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ पासून ते आतापर्यंत हा प्रकार गेरा इम्पेरियम, ऑफिस नं. ९०५, विप्रो सर्कल, फेज २, हिंजवडी येथे सुरू होता.
या प्रकरणी पांडुरंग पदमाकर केंद्रे (वय २३, रा. हिंजवडी, मूळ रा. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी व इतर तरुणांकडून नोकरी लावून देणे, प्रोजेक्ट मिळवून देणे तसेच इतर कंपन्यांत संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर प्रशिक्षण फी, डिपॉझिट आणि कमिशनच्या नावाखाली कंपनीच्या खात्यावर तसेच विविध कन्सल्टन्सीमार्फत पैसे जमा करण्यास भाग पाडले.
फिर्यादी आणि इतरांकडून पैसे घेतल्यानंतर आरोपींनी काही काळ प्रशिक्षण दिले व काम करून घेतले. मात्र कोणताही प्रोजेक्ट न देता वेगवेगळी कारणे सांगत वेळ मारून नेली. नंतर भरलेली रक्कम परत मागितल्यानंतर कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान संबंधित कंपनीचे कार्यालयही बंद असल्याचे समोर आले.
या प्रकरणी खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे :
अॅक्युअर सॉफ्टटेक प्रा. लि. चे संचालक अमोल बाळासाहेब महाडीक
ओमकार दादासो महाडिक
कंपनीतील इतर संबंधित व्यक्ती व विविध कन्सल्टन्सी प्रतिनिधी
हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३१६(५), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि ताकतोडे करीत आहेत. आयटी क्षेत्रातील नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीमुळे तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




