spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत अल्पवयीनाकडून देशी पिस्तूल जप्त; शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. या प्रकरणात शस्त्र पुरवठा करणाऱ्या संशयिताचा शोध सुरू असून परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास शिवशंकर मंदिराजवळ, पिंपरी ब्रिज परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे ५० हजार ५०० रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल विनापरवाना जप्त करण्यात आले. सदर परिसरात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही त्याने आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित पिस्तूल आणि काडतुसे पप्पीसिंग (रा. मध्य प्रदेश) याच्याकडून घेतल्याची माहिती विधीसंघर्षित बालकाने दिली. त्यानुसार मुख्य आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस शिपाई रोहित रघुनाथ वाघमारे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास सपोनि अतिग्रे करीत आहेत. शहरात अल्पवयीनांच्या हाती शस्त्रे सापडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!