पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
रावेत येथील धर्मराज चौक परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज रोडवरील होंडा शोरूमसमोर फुटपाथवर ही घटना घडली. फिर्यादी महादेव दिलीप बिरादार (वय ४५, रा. शिंदे वस्ती, रावेत) हे ओळखीच्या व्यक्तींमधील भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपी अनिल हौसिलाल चव्हाण याने रागाच्या भरात शिवीगाळ करत चाकूने बिरादार यांच्या डाव्या हाताच्या दंडावर व मनगटाजवळ वार करून जखमी केले.
या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.




