पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
म्हाळुंगे परिसरात हायड्रोपोनिक गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ मार्च २०२६ रोजी पहाटे ३.२० वाजण्याच्या सुमारास वास्कायबे सोसायटी शेजारी, म्हाळुंगे येथे रस्त्याकडेला संशयास्पद हालचाली आढळून आल्या. यावेळी आरोपी गौरव रमेशकुंटे (वय २४, रा. उत्तमनगर, बावधन) व विवेक सुनील चौधरी (वय २१, रा. उत्तमनगर, बावधन) यांच्या ताब्यातून २९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आला.
तपासादरम्यान आरोपींकडून एकूण सुमारे ६० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व मोबाईल फोन असा एकूण ६,५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.




