पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत ५ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ पासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे-नाशिक महामार्गावरील योगिराज असोसिएट येथे आरोपी सोमनाथ पठारे (वय ४०) व शुभम पाटील (वय ३०, दोघे रा. भोसरी) यांनी फिर्यादी शांताराम मारुती शिर्के (वय ५४, रा. येरंडवना, पुणे) यांना CMEGP अंतर्गत कर्ज व सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
कर्ज मंजुरीसाठी बँक व जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगून आरोपींनी फिर्यादी व इतरांकडून वेळोवेळी एकूण ५ लाख ४६ हजार ५०० रुपये रोख व बँक खात्यातून घेत फसवणूक केली.
या प्रकरणी भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.




