spot_img
spot_img
spot_img

शहरातील केबल जाळ्यावर तात्काळ कारवाई करा – आमदार अमित गोरखे

पिंपरी-चिंचवडमधील जीवघेण्या ‘ओव्हरहेड’ वायरिंगविरोधात आक्रमक भूमिका — प्रशासनाला २४ तासांत संपूर्ण जाळे हटवण्याचे अल्टिमेटम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड, २८ एप्रिल २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट वायरींचे जीवघेणे जाळे पसरले असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आता निष्पापांचे बळी जाऊ लागले आहेत. काल सेक्टर २६ परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, या ‘डेथ ट्रॅप’ला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? असा संतप्त सवाल आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे.

सेक्टर २६ परिसरात वाय-फाय केबल गळ्यात अडकून श्रीमती संपदा पटवर्धन यांचा झालेला मृत्यू ही निव्वळ दुर्घटना नसून प्रशासकीय अनास्था आणि संबंधित कंपन्यांचा निष्काळजीपणा यामुळे झालेली ‘हत्या’ आहे, अशा तीव्र शब्दांत आमदार अमित गोरखे यांनी संताप व्यक्त केला आहे.

घटनेचे गांभीर्य
प्रबोधन सोसायटीमधील श्रीमती पाटवर्धन या ज्ञानप्रबोधिनी शाळेतून घरी परतत असताना शीत छाया परिसरात रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबलमुळे त्यांचा अपघात झाला. ४-५ फूट उंचीवर अशा प्रकारे मृत्यूचे पाश सोडून देणाऱ्या संबंधित इंटरनेट/वाय-फाय सेवा पुरवठादार कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार गोरखे यांनी केली आहे.

प्रशासनाला कडक सूचना
या घटनेची दखल घेत आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित विभागाला पत्र व्यवहार केला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी. तसेच संपूर्ण शहरातील, विशेषतः अंतर्गत रस्त्यांवरील लोंबकळणाऱ्या आणि धोकादायक केबल्स २४ तासांच्या आत हटवण्यात याव्यात. ज्या कंपनीची ती केबल होती, त्या कंपनीचा परवाना रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. पावसाळा तोंडावर असताना अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आणि बेदरकार वाहनचालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने आवश्यक तिथे दर्जेदार स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी भूमिका आमदार अमित गोरखे यांनी घेतली आहे.

नगरविकास विभागाकडे लेखी पत्राद्वारे पाठपुरावा
या अत्यंत दुःखद घटनेनंतर आमदार अमित गोरखे यांनी श्रीमती संपदा पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत पटवर्धन कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत ओव्हरहेड वायर्सचे जीवघेणे जाळे पसरले असल्याबाबत आमदार अमित गोरखे यांनी यापूर्वीच नगरविकास विभागाकडे लेखी पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवरील या धोकादायक वायर्स तातडीने हटवून त्याबाबत ठोस धोरणात्मक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली होती. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी आता आरपारची लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!