spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या साईटवर मोठी चोरी उघड – ७ जण ताब्यात, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

२८० स्क्वेअर मीटर अॅल्युमिनियम सेंट्रींग प्लेट चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; वाहनांसह माल हस्तगत

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चाकण परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून अॅल्युमिनियम सेंट्रींग प्लेट चोरी करणाऱ्या टोळीचा चाकण उत्तर पोलीसांनी पर्दाफाश करत चार मुख्य आरोपींसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान राक्षेवाडी (ता. खेड) येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या २१० घरांच्या बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २० लाख रुपये किंमतीच्या २८० स्क्वेअर मीटर अॅल्युमिनियम सेंट्रींग प्लेट्स चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान घटनास्थळी आढळलेल्या एका बेवारस मोटारसायकलचा धागा पकडत तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी करत पोलिसांनी मुख्य आरोपी रामरक्षा उर्फ राजू धर्मराज पासवान (रा. सुसगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली.

यानंतर पोलिसांनी स्वराज कालापाड, स्वप्नील कालापाड, अक्रम खान यांना येलवाडी येथून अटक केली. तसेच चोरीचा माल खरेदी करणाऱ्या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने, दोन मोटारसायकली आणि मोठ्या प्रमाणात अॅल्युमिनियम सेंट्रींग प्लेट्स जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली, तसेच पोलीस उप आयुक्त (परीमंडळ ३) मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चाकण विभागाचे सहा पोलीस आयुक्त सचिन कदम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी बजावली.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!