भाजप नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून ही लीग आयोजित करण्यात आली आहे. निवड चाचणीच्या पहिल्या दिवशी लांडगे यांच्या वतीने कबड्डीतील दिग्गज खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातून घडलेल्या आणि भारतीय कबड्डी संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांच्या वाटचालीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या सन्मानामागील उद्देश होता.
या सोहळ्याला राजेंद्र आंदेकर, संदीप पायगुडे, डॉ. मिलिंद जाधव, राष्ट्रीय खेळाडू निलेश नाना लोखंडे, आदिनाथ गवळी, सुनील लांडे, राजेश ढमढेरे, दीपक धावडे, दत्ता माने, सागर गोळे, तुषार नागरगोजे, प्रकाश पवार, मच्छिंद्र लांडगे यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक आणि कबड्डीप्रेमी उपस्थित होते.
स्थानिक कबड्डीपटूंना स्पर्धेचे व्यासपीठ मिळावे आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करता यावी, या हेतूने लीगची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि स्पर्धात्मक वृत्ती यामुळे लीगच्या पुढील टप्प्यांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, अशोक शिंदे आणि राजू घुले यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते शोभा शिंदे भगत, शीतल मारणे, सुमती पुजारी, पूजा शेलार, माणिक भोगाडे आणि विराज लांडगे यांचाही गौरव करण्यात आला. आशियाई सुवर्णपदक विजेते अस्लम इमानदार आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते आदित्य शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. यासह शुभम शिंदे, पंकज मोहिते, अजित पवार आणि शिवम पठारे यांच्या कामगिरीचाही गौरव करण्यात आला.
“कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला, जिद्द, शिस्त आणि संघभावना शिकवणारा आपला अभिमानाचा खेळ आहे. आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा गौरव वाढविला आहे. त्यांचा सन्मान करणे, ही आपली कृतज्ञता आहे. धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्थानिक आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रतिभेला योग्य संधी मिळावी आणि नव्या पिढीने कबड्डीतून मोठी स्वप्ने पाहावीत, हा आमचा संकल्प आहे. खेळाडूंच्या घामाला सन्मान आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




Total Users : 243450