शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘उठा उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला…’ या भक्तिमय स्वरांनी दुमदुमलेल्या भोसरी गावठाणातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आमदार महेश लांडगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून पारंपरिक काकड आरतीचा भक्तिभावाने आनंद घेतला. विठ्ठलनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि वारकरी परंपरेच्या मंगलमय वातावरणात आमदार लांडगे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा भोसरी गावठाणात आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. याच परंपरेचा भाग असलेल्या पहाटेच्या काकड आरतीमध्ये सहभागी होत आमदार महेश लांडगे यांनी विठ्ठलभक्तीचा अनोखा अनुभव घेतला.
यावेळी भोसरी गावातील ज्येष्ठ मान्यवर, ग्रामस्थ आणि विठ्ठलभक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. आरतीनंतर आमदार लांडगे यांनी गावातील ज्येष्ठ आणि जाणत्या ग्रामस्थांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. त्यांच्या आशीर्वादासह गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेबद्दल आत्मीयता व्यक्त केली.
भोसरीच्या मातीशी असलेली नाळ आणि वारकरी संस्कृतीविषयीची श्रद्धा यांचे दर्शन या निमित्ताने घडले. लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक जीवनात कार्यरत असतानाही गावातील धार्मिक परंपरा, ज्येष्ठांचा सन्मान आणि सांस्कृतिक वारसा यांच्याशी असलेले नाते आमदार लांडगे यांनी या उपस्थितीतून अधोरेखित केले.
काकड आरती ही केवळ धार्मिक उपासना नसून भक्ती, समता, एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी महाराष्ट्राची महान सांस्कृतिक परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि समस्त वारकरी संतांनी दिलेल्या विचारांचा वारसा अशा धार्मिक उपक्रमांतून आजही जिवंत असल्याची भावना या निमित्ताने व्यक्त झाली.
वारकरी संस्कृतीचा वारसा जपण्याचा संदेश
महाराष्ट्राच्या संतपरंपरेने समाजाला भक्तीबरोबरच माणुसकी, समरसता आणि परस्पर सन्मानाची शिकवण दिली आहे. भोसरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील काकड आरतीच्या निमित्ताने या विचारांचा पुन्हा एकदा जागर झाला. विठ्ठलनामाचा गजर अखंड सुरू राहावा आणि भक्ती-संस्कृतीचा हा अनमोल वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, अशी प्रार्थना आमदार लांडगे यांनी पांडुरंग चरणी केली.
‘‘श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होताना मनाला विलक्षण समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. भोसरी गावठाणातील काकड आरतीची परंपरा ही आपल्या गावाच्या श्रद्धेची आणि सांस्कृतिक समृद्धीची ओळख आहे. संतांनी दिलेली भक्ती, समता, माणुसकी आणि एकात्मतेची शिकवण हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे. ज्येष्ठ ग्रामस्थांचे आशीर्वाद आणि विठ्ठलभक्तांचा स्नेह ही माझ्यासाठी मोठी शिदोरी आहे. पांडुरंगाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना!’’
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड, पुणे.




Total Users : 238137