spot_img
spot_img
spot_img

थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शून्य कचरा शाळा प्रकल्पाचे उद्घाटन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शून्य कचरा संकल्पना म्हणजे ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे योग्य व्यवस्थापन करून त्या परिसरातून कचरा बाहेर जाणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणे होय. शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेतच करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ हा उपक्रम पुढे शून्य कचरा प्रभाग ते संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर शून्य कचरा करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, शिक्षण समितीच्या सभापती रवीना आंगोळकर, शिक्षण समिती सदस्या तथा नगरसदस्या रिटा सानप, योगिता बारणे, नगरसदस्य तानाजी बारणे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले, बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका अर्चना कांडेकर, ज्योती तापकीर, शून्य कचरा शाळा मार्गदर्शक अर्चना मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

नगरसदस्या योगिता बारणे यांच्या पुढाकारातून थेरगाव शाळेत शून्य कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला असून या प्रकल्पाचा शुभारंभ केल्यानंतर विद्यार्थ्यांना शून्य कचरा रिसायकल बॅग तसेच शून्य कचरा किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेतच झाले पाहिजे. ही शून्य कचरा शाळेची संकल्पना आहे. ही संकल्पना शाळेत यशस्वीपणे राबवण्याचे नियोजन महापालिका करीत आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत ‘शून्य कचरा मॉनिटर’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मॉनिटरचे काम शाळेत कोणीही कचरा टाकत असेल, तर त्याला समजावून सांगणे आणि शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लक्ष देणे असेल. संपूर्ण शहर कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग तर आवश्यक आहेच; पण विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनादेखील या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरावा. घरातील स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट याबाबत त्यांनाही जागरूक करावे. ही संकल्पना आणखी किती शाळांमध्ये राबवता येईल, यादृष्टीनेदेखील नियोजन सुरू आहे. थेरगावच्या शाळेत हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवून विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांचा प्रतिसाद आणि या उपक्रमाचे परिणाम यांचा अभ्यास करून त्यानंतर इतर शाळांमध्येही हा उपक्रम कशा पद्धतीने राबवता येईल, याबाबत निर्णय घेता येईल, असेदेखील डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना योगिता बारणे यांनी शून्य कचरा प्रकल्प सुरू करण्यामागील भूमिका विषद केली. तर आभार प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी मानले.

पुस्तक वाचून मला नक्की फोन करा!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता के सुपरहीरोज’ या पुस्तकाचे वाटप केले. यावेळी ते म्हणाले की, ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ या प्रकल्पात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचावे. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा स्वच्छतेचा सुपरहिरो बनला पाहिजे. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करा, आपल्या घरापर्यंत पोहोचवा आणि आपल्या शाळेतून संपूर्ण शहरात हा संदेश पोहोचवा. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, तसे आपले शहरही स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच ‘स्वच्छता के सुपरहीरोज’ हे पुस्तक वाचल्यानंतर त्यातून तुम्हाला काय समजले, काय नवीन शिकायला मिळाले, हे मला नक्की फोन करून सांगा. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला नेमका काय अनुभव आला, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल. कारण विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मोबाईलपेक्षा पुस्तक वाचन, खेळ आणि चांगल्या सवयी यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, असेदेखील आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

पीएम श्री माध्यमिक शाळेतील आधुनिक सुविधांची आयुक्तांकडून पाहणी

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक शाळेला भेट देऊन शाळेतील विविध शैक्षणिक सुविधा आणि उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील अॅस्ट्रोनॉमी लॅब, टिंकरिंग लॅब, रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. तसेच शाळेच्या परिसरातील भिंतीवर विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या आकर्षक वारली चित्रांची पाहणी करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!