शबनम न्यूज | प्रतिनिधी
साईनाथ नगर येथील अंतर्गत मुख्य रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांच्या आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्या सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
साईनाथ नगर येथील रस्ता निगडी परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. परिसरात दाट लोकवस्ती असून महिला, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक रहिवासी आणि शाळकरी मुलांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मात्र, अनेक वाहनचालक वेगाने आणि बेदरकारपणे वाहने चालवत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून, त्यामध्ये नागरिक जखमी झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी भरधाव वाहनाच्या धडकेत एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
साईनाथ नगरमधील मुख्य रस्ता आणि अंतर्गत चौकांची तातडीने पाहणी करून अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करावीत. आवश्यक त्या ठिकाणी नियमानुसार गतिरोधक किंवा रंबल स्ट्रिप्स बसवाव्यात. तसेच, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना गतिरोधक स्पष्टपणे दिसण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह पांढरे पट्टे आणि वेग कमी करण्याबाबतचे इशारा फलक लावावेत, अशी मागणी सुलभाताई उबाळे यांनी केली आहे.
नागरिकांच्या जीविताचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, आणखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. आता या मागणीची दखल घेऊन महापालिका प्रशासन साईनाथ नगरमधील रस्ते सुरक्षेसाठी कोणती पावले उचलते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 233381