spot_img
spot_img
spot_img

नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर महाराष्ट्र शासनाचा भर असून, एकात्मिक डिजिटल सेवा प्रणाली आणि शेतीविषयक स्मार्ट मार्गदर्शनाच्या माध्यमातून नागरिकाभिमुख प्रशासनाला नवी दिशा देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणांनी दिली. मंत्रालयात आयोजित ‘प्रिल्यूड परिषद २०२६’मध्ये प्रशासकीय कामकाजातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, शासकीय योजनांची सुलभता आणि तंत्रज्ञानाधारित सेवा वितरणाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.

 

भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील नागरिक सेवा’ या विषयावर ‘प्रिल्यूड परिषद २०२६’चे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिषदेत भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे मानद सचिव डॉ. विजय सतबीरसिंग, मानद कोषाध्यक्ष विकास देवधर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक अमोद सूर्यवंशी आणि कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक मीनल करनवाल यांनी विषयतज्ज्ञ म्हणून सहभाग घेतला. प्रशासकीय सेवांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या विविध पैलूंवर या परिषदेत चर्चा करण्यात आली.

अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या दिल्ली येथील राष्ट्रीय संस्थेकडून देशभरातील शाखांसाठी दरवर्षी एक समान विषय निश्चित केला जातो. यंदा ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील नागरिक सेवा’ हा विषय निवडण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे सैद्धांतिक विवेचन करण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजात तिचा वापर करून नागरिकांना कशा प्रकारे चांगल्या सेवा देता येतील, यावर परिषदेचा भर असल्याचे क्षत्रिय यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक संकेतस्थळांवर नोंदणी करणे, कागदपत्रे सादर करणे आणि अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी वारंवार कार्यालयांना भेटी देणे अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एकात्मिक डिजिटल सेवा प्रणाली विकसित करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने नागरिकांना पात्र योजनांची माहिती, सुलभ अर्जप्रक्रिया आणि अधिक गतिमान सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या आयुक्त भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले.

नागरिकांना वारंवार विविध संकेतशब्द आणि एकवेळ वापरायचे संकेतांक मिळविण्याची गरज भासू नये, यासाठी ‘महा आयडी’च्या माध्यमातून एकच प्रवेश व्यवस्था विकसित करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि पडताळणीसंबंधी अडचणी लक्षात घेऊन ही व्यवस्था अधिक सुलभ करण्याचे नियोजन आहे. भविष्यात नागरिकांना त्यांच्या नैसर्गिक भाषेत संवाद साधून शासकीय सेवा आणि प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता यावा, हाही या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. नवीन योजना जाहीर झाल्यानंतर त्यांची संगणकीय प्रणालीवर अंमलबजावणी करण्यासाठी लागणारा कालावधी कमी करणे, पात्र नागरिकांना प्रमाणपत्रे स्वयंचलितपणे उपलब्ध करून देण्याच्या शक्यता तपासणे आणि विविध विभागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविणे, या दिशेनेही शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे भुवनेश्वरी एस. यांनी नमूद केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!