शबनम न्यूज | प्रतिनिधी
सोसायटीच्या पाण्याच्या नळाला पाइप लावून गाड्या धुण्यास विरोध केल्याच्या कारणावरून चऱ्होली परिसरातील अभिमान श्री सोसायटीमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल माधवराव शिंपाळे (वय ३३) हे चऱ्होली खुर्द येथील अभिमान श्री सोसायटीमध्ये राहतात. २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोसायटीच्या पाण्याच्या नळाला पाइप लावून गाड्या धुतल्या जात असल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी जखमी निलेश चव्हाण यांनी सध्या पाणीटंचाई सुरू असल्याने सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर गाड्या धुण्यासाठी नळाला पाइप लावू नये, असा संदेश दिल्याचे सांगितले. तरीही गाड्या धुतल्या जात असल्याबाबत विचारणा केल्यावर वाद वाढल्याचा आरोप आहे.
या वादातून आरोपींनी निलेश चव्हाण आणि प्रांजय तानाजी भालेराव यांना शिवीगाळ करून हाताने व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सचिन कोठावळे (वय ४६), विवेक कोठावळे (वय १८), कुणाल कोठावळे (वय २०), आशीष भालेराव (वय २८) आणि गणेश धातपांडे (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, १८९(२), १९१(२) आणि १९० नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.




Total Users : 238179