शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी येथील वाघजाई पेट्रोल पंपावर इंजिन ऑइलच्या किमतीवरून झालेल्या वादातून एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवन राजाराम पांढरे (वय ३३, रा. आळंदी, मूळ रा. सुकटा, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.०५ वाजता ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करीत असताना चारचाकी वाहनातून चार अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यापैकी एका व्यक्तीने मॅक कंपनीचे इंजिन ऑइल मागितले. फिर्यादीने एका लिटर ऑइलची किंमत ३६९ रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने ऑइल घेतले आणि यूपीआय स्कॅनरद्वारे पैसे भरले.
मात्र, पैसे भरल्यानंतर ऑइलवर सवलत का दिली नाही, असा जाब विचारत संबंधित व्यक्तीने वाद घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर वाहन पेट्रोल पंपाच्या बाजूला उभे करून काही वेळाने पुन्हा दोघे फिर्यादीकडे आले. त्यांनी आणखी एक लिटर ऑइल मागितले. फिर्यादीने ऑइल दिल्यानंतर त्यांनी सवलतीची मागणी केली. सवलत मिळणार नसल्याचे सांगितल्यावर आरोपींपैकी एकाने स्वतःचे नाव देवा जमादार असल्याचे सांगत फिर्यादीला ओळखत नसल्याबद्दल जाब विचारला आणि मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर संबंधित व्यक्तीने कमरेला लावलेले पिस्तूल काढून फिर्यादीच्या दिशेने रोखल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पेट्रोल पंपावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आजूबाजूचे ग्राहक घाबरून पळून गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर संबंधित चारही व्यक्ती एमएच १२ क्यूडब्ल्यू ०२८९ क्रमांकाच्या पांढऱ्या स्विफ्ट कारमधून निघून गेल्या.
या प्रकरणात देवानंद ऊर्फ देवा भीमाशंकर जमादार (वय २९), सुलतान इसुफ खान (वय ३२), विलास धाऊ झेबे (वय २९) आणि काशिनाथ कल्याण काळे (वय २८) यांच्यासह कुणाल साहेबराव रणवीर (अंदाजे वय २२) अशी नावे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत. त्यातील आरोपी क्रमांक १ ते ४ यांना अटक झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. गुन्हा भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार नोंदविण्यात आला आहे.




Total Users : 238220