शबनम न्यूज | प्रतिनिधी
येलवाडी परिसरातील शेतजमिनीच्या वादातून एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. शेतात ट्रॅक्टर फिरवून नुकसान केल्याचा आरोप करत फिर्यादीने चार जणांविरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष अंकुश गाडे (वय २२, व्यवसाय शिक्षण, रा. जिल्हा परिषद शाळेमागे, येलवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास येलवाडी गावाच्या हद्दीतील गट क्रमांक १६२ मधील शेतजमिनीत ही घटना घडली.
तक्रारीनुसार, आरोपी ट्रॅक्टर घेऊन शेतात आले आणि रोटर फिरवून नुकसान करू लागले. फिर्यादीच्या वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना काठीने पाठ, गुढघे आणि चेहऱ्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीची आई भारती आणि भाऊ अक्षय हे मदतीसाठी आले असता त्यांनाही बांबूने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच कुटुंबीयांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात सागर रामदास नाईकरे (वय ३२), अंकुश रामदास नाईकरे, योगेश विश्वास गाडे आणि संभाजी गोविंद गाडे यांची नावे आरोपी म्हणून नमूद आहेत. आरोपी क्रमांक एकला अटक झाल्याचा उल्लेख पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात आहे.
दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. शेतजमिनीच्या वादातून घडलेल्या या प्रकाराचा पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 231658