शबनम न्यूज | प्रतिनिधी
ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत निगडीतील एका व्यक्तीची २४ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. GrowPWM या अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करवून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज अरविंद चव्हाण (वय ४६, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. २० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे नमूद आहे.
तक्रारीनुसार, मोबाइलधारक अज्ञात महिलेने व्हॉट्सॲपवर शेअर मार्केटशी संबंधित लिंक पाठवून GrowPWM अॅपमध्ये नोंदणी करण्यास सांगितले. त्यानंतर ऑनलाइन शेअर्स खरेदी-विक्री करून मोठा नफा मिळवता येईल, असे सांगण्यात आले. अॅपच्या कस्टमर सपोर्टच्या नावाखाली संपर्क साधणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करवून घेतल्याचा आरोप आहे.
गुंतवणुकीची रक्कम किंवा त्यावरील परतावा परत न मिळाल्याने एकूण २४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणात अज्ञात महिला, GrowPWM अॅपचा वापर करणारे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यांचे धारक यांची भूमिका तपासली जात आहे.
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. ऑनलाइन गुंतवणुकीतील या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




Total Users : 238232