शबनम न्यूज | प्रतिनिधी
बौद्धनगरमधील गिरजुबाबा मंदिराजवळ दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर जुन्या वादातून हत्यारांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, यश बाळासाहेब गायकवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता गिरजुबाबा मंदिराजवळ, बौद्धनगर परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी दांडिया पाहण्यासाठी गेले असताना आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपींनी कोयता, पालघन आणि बांबूसारख्या वस्तूंचा वापर करून हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीने वार अडवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. तसेच पाठीवरही वार करण्यात आल्याचे पोलिसांच्या नोंदीत म्हटले आहे.
या घटनेत भगवान नरहरी माने, साहिल माने, निखिल माने, एक महिला आरोपी आणि विकास माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी भगवान माने आणि महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हल्ल्यानंतर परिसरात दहशत निर्माण झाल्याने नागरिक पळून गेल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५६/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 238186