शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिक्षणाद्वारे केवळ सुशिक्षित व्यक्ती नव्हे, तर अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव असलेला, समाजाप्रती आस्था व संवेदनशीलता बाळगणारा आणि देशाप्रती जबाबदारी असलेला नागरिक घडला पाहिजे. शिक्षणातून समाजाला समर्पित आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडले, तरच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत (स्मार्ट नागरिक)’ या शैक्षणिक उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमांचे ‘स्मार्ट नागरिक’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. मुंबईतील दादर पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महापौर रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, आमदार सर्वश्री अमित साटम, महेश सावंत, कालिदास कोळंबकर, शिक्षण समिती सभापती राजश्री शिरवडकर, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांना विविध संवाद माध्यमांतून जगभरातील माहिती सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे माहितीपूर्ण आणि हुशार पिढी घडत असली, तरी तिच्यात सामाजिक जाणीव आणि कर्तव्यभावना रुजविणे तितकेच महत्वाचे आहे. समाजाने उभ्या केलेल्या व्यवस्थेमुळे आपल्याला शिक्षण घेता येते आणि व्यक्तिमत्व विकसित करता येते. त्यामुळे समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे, याचे भान विद्यार्थ्यांना असले पाहिजे.
संविधानातील मूल्ये आचरणात आणावीत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे भारताच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे. संविधानातील मूल्ये आत्मसात केली, तर विद्यार्थी केवळ स्मार्ट नागरिकच नव्हे, तर विकसित भारताच्या उभारणीत योगदान देणारे जबाबदार नागरिक बनतील. संविधानाने दिलेले अधिकार समजून घेण्याबरोबरच त्यात सांगितलेल्या कर्तव्यांचे पालन करणेही गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे आहे. समता, न्याय आणि समान संधी या मूल्यांच्या आधारे विविध भाषा, जाती, धर्म आणि संस्कृती असलेल्या देशाला एकत्र ठेवण्याचे काम संविधान करते. त्यामुळे संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची मूल्येही महत्वाची
छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-जमातींना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. या कार्यामागे एकता, निर्भयता आणि समाजाप्रती संवेदनशीलता ही मूल्ये होती. स्वराज्याच्या उभारणीतून दिसणारी ही मूल्ये आणि भारतीय संविधानाने दिलेली तत्वे विद्यार्थ्यांनी समजून घ्यावीत. या मूल्यांच्या आधारे जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाज आणि देशासाठी काम करता येते, असे फडणवीस यांनी नमूद केले.
‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची समज, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न महत्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताच्या संविधानाने भविष्याचा वेध घेतला आहे. भारतीय मातीतली मूल्ये लक्षात घेऊन संविधान तयार झाले आहे. देशातील निर्णय लोकशाही आणि संवैधानिक प्रक्रियेनुसारच घेतले गेले पाहिजेत, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संविधानाचे महत्व अधोरेखित केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय मिळविण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध दाद मागताना संवैधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
विविधतेने नटलेल्या देशात एकता टिकविणे आणि प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देणे, हे संविधानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संविधानातील अधिकार आणि कर्तव्ये समजून घेतल्यास तत्त्वनिष्ठ आणि मूल्यनिष्ठ समाज घडविता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेत बजावलेल्या भूमिकेचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. संविधानाचे अभ्यासक आणि न्यायव्यवस्थेत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.




Total Users : 238188