spot_img
spot_img
spot_img

सायबर सुरक्षा आणि AI जागरुकतेचा संदेश देत नवरात्रोत्सवाचा अनोखा मेळावा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

फ्लॅट संस्कृतीच्या बंदिस्त चौकटीला छेद देत थेरगाव-वाकड परिसरातील ‘भगवती रॉयल हौसिंग सोसायटी’ने सामाजिक एकता आणि आत्मनिर्भरतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सोसायटीच्या उत्सव मंडळाने महिला आणि बालकांसाठी थेट पोलीस प्रशासनाच्या वतीने सायबर सुरक्षा आणि सामाजिक जागृतीपर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले व्यासपीठावर उपस्थित होते.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आणि संवादाचे आवाहन
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात दैनंदिन जीवनात सायबर गुन्ह्यांपासून (Cyber Crime) स्वतःचा बचाव कसा करावा, मोबाईल बँक फसवणूक आणि सोशल मीडिया वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगातील गंभीर समस्येवर बोट ठेवत ते म्हणाले, “आजच्या युगात पालकांनी आपल्या मुलांशी रोज संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. संवादामुळे मुलांमधील मानसिक ताण कमी होतो आणि ते कोणतेही टोकाचे पाऊल उचलणार नाहीत.” सोसायटी परिसरातील पारिजातक फुलाच्या सुवासाप्रमाणेच नागरिकांनी समाजात आपुलकीचा सुगंध पसरावावा, असे सांगत त्यांनी आपल्या हजरजवाबी शैलीने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी लहान मुलांनी त्यांच्यासोबत उत्साहाने फोटो काढले.

मोबाईलचा अतिरेक आणि AI चे दुष्परिणाम
सोसायटीचे रहिवासी डॉ. अमोल पाटील यांनी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (AI) चे मानवी जीवनातील वाढते महत्त्व सांगतानाच, मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढीवर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात हितचिंतक रहिवासी योगेश पाटील यांनी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक सण साजरे करण्याचे सामाजिक, वैयक्तिक आणि व्यावहारिक फायदे विशद केले. शेजाऱ्यांमधील संवाद वाढणे, एकटेपणा दूर होणे आणि बालकांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळणे यासाठी असे सण गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘नारी शक्ती’ आणि आत्मनिर्भर वॉलिंटियर्सचे योगदान
या संपूर्ण सोहळ्यात महिलांचा (नारी शक्ती) सहभाग लक्षणीय होता. पारंपरिक हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून महिलांनी दांडिया आणि रील्सचा मनसोक्त आनंद लुटला. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, बाहेरील कोणत्याही कमर्शियल एजन्सीची मदत न घेता भव्य देखावा, विद्युत रोषणाई आणि स्टेज उभारणीचे सर्व काम सोसायटीतील वॉलिंटियर्सनी स्वतः केले.

केवळ सणच नव्हे, तर २०१९ मधील महाभयंकर महापुरातही ‘महापुराला उत्तर माणुसकीच्या सरकारने’ या मोहिमेअंतर्गत राजहंस पाटील आणि सुनील आचरे यांच्या पुढाकाराने या मंडळाने पूरग्रस्तांना मोठी मदत पाठवून सामाजिक भान जपले होते.

१२ वर्षांची यशस्वी परंपरा
गेल्या १२ वर्षांपासून (२०१२ पासून) भगवती रॉयल सोसायटीने ‘एक सोसायटी, एक उत्सव’ ही परंपरा यशस्वीपणे जपली आहे. नवीन पिढी (‘Zen G’) आणि नारी शक्तीच्या पाठबळामुळे हा सामाजिक एकतेचा संदेश इतर सोसायट्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशी माहिती योगेश पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

या भव्य कार्यक्रमाचे नेटके नियोजन उत्सव मंडळाचे अध्यक्ष मयूर पवार आणि उपाध्यक्ष उमेश पेंडभाजे यांच्या मार्गदर्शनाखाली खजिनदार चिंतन कंसारा, संदीप भारद्वाज, मनोज चौधरी आणि सतीश कोलगे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन केले. त्यांना अमोल वाघ, प्रभाकर कुमार, मयंक अग्रवाल, राहुल दसरे, अविनाश देशमुख आणि राहुल जहागीरदार यांनी मोलाची साथ दिली.
हा वारसा जतन करण्यासाठी २०१२ पासुन मोलाचे सहकार्य करणाऱ्या रिपेन भाई, विक्रम, वरद जोशी, रघु उज्जेनकर, अमित टिंगरे, विघ्नेश नायक, शिंत्री साहेब, कौस्तुभ भादेकर, विनय कुलकर्णी, रवींद्र उत्तेकर आणि मुकेश बाफना यांच्या योगदानाचाही यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला. एका सुरक्षित आणि सुजाण समाजाचा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!