२०२० मध्ये लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष; शेकडो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे गुरव आणि नवी सांगवी विभागात सालाबादप्रमाणे यंदाही श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. २०२० मध्ये काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे आज मोठ्या जनचळवळीत रूपांतर होत आहे. तरुणाईमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक एकोपा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा रुजवण्याच्या उद्देशाने ही दौड आयोजित केली जात आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या संस्कारांतून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातून प्रेरणा घेत या दौडीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-जमातींतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्याच एकतेचा आणि संघटित शक्तीचा संदेश आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम श्री दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून केले जात आहे.
आजच्या काळात तरुणाईला योग्य दिशा मिळावी, समाजातील ऐक्य अधिक मजबूत व्हावे आणि नव्या पिढीमध्ये शिस्त, संस्कार व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला मोजक्याच कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार आता व्यापक स्वरूप धारण करत असून, दरवर्षी या दौडीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे.
या दौडीमुळे तरुणांमध्ये एकत्रितपणे काम करण्याची भावना निर्माण होत असून, त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणाही मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, मराठी संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
या उपक्रमात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे म्हणाले, “श्री दुर्गामाता दौडीमध्ये आजच्या तरुण पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायला हवे. या दौडीच्या माध्यमातून आपल्याला मराठी संस्कृतीचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांतील मावळ्यांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, याची प्रेरणा घेता येते. तरुणांनी या विचारांचा अंगीकार करून समाजासाठी कार्य करावे.”
नवी सांगवी विभागात दुर्गामाता दौड सुरू करण्यासाठी निशिकांत वानखडे, सुशांत पोतदार, साई कोढंरे, सचिन बंडगर, अजिंक्य बोरडे, स्वप्नील सावंत, अमोल सुतार, प्रशांत ढोबळे, शुभम गावडे, भागवत भांडे, ओमकार भिर्वे, ओम देशमुख, प्रतीक भोसले यांच्यासह अनेक तरुण आणि नागरिक दरवर्षी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देत आहेत.
काही मोजक्या कार्यकर्त्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज मोठ्या समुदायाच्या सहभागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे श्री दुर्गामाता दौड ही केवळ धार्मिक परंपरा न राहता तरुणाईला संघटित करणारा, संस्कारांची जाणीव करून देणारा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारा उपक्रम म्हणून पुढे येत आहे.
“थांबतील ते मावळे कसले!” या प्रेरणादायी भावनेतून श्री दुर्गामाता दौडीचा प्रवास सुरू असून, अधिकाधिक तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून सकारात्मक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.




Total Users : 231144