शबनम न्यूज | प्रतिनिधी
भाजपच्या स्थानिक नगरसेवकांसह सर्वांचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपने निगडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उद्यानातील सात एकरावरील अप्पूघर थेट १५ वर्षांसाठी पुष्पक अम्युजमेंटला भाड्याने दिले आहे. येथील राईड्सची सुरक्षा तपासणी ऑडीट, विद्युत सुरक्षेबाबत व इतर आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रांची कोणतीही पूर्तता करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांना महापालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. काम सुरु करण्याची आणि पूर्ण करण्याची प्रस्तावित कालमर्यादा, सध्याच्या कामाच्या प्रगतीबाबतचीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. कोणतीही माहिती नसताना सात एकरवरील अप्पुघर ठेकेदाराला आंदण दिले आहे का, असा संतप्त सवाल नगरसेवक वाघेरे यांनी विचारला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या निगडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उद्यानातील अप्पूघर पुष्पक अम्युजमेंटला सन २००५ मध्ये २१ वर्षांकरिता भाड्याने देण्यात आले होते. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. या संस्थेकडे ६ लाख ८३ हजार ६६५ रुपयांची थकबाकी आहे. असे असताना या ठेकेदाराने २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने दोन वर्षे वॉटर पार्क बंद ठेवावा लागल्याचा दावा केला. कोरोनामध्ये मार्च २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत अप्पुघर व वॉटर पार्क बंद असल्याने नुकसान झाल्याचे सांगून तीन वर्षांची मुदतवाढ मागितली होती. ठेकेदाराने तीन वर्षांची मुदतवाढ मागितली असताना सत्ताधारी भाजपने मेहरबानी दाखवित थेट १५ वर्षांची मुदतवाढ दिली.
याप्रकल्पाबाबत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी उत्तरे मागितली होती. त्याला भूमी आणि जिंदगी विभागाने दिलेल्या लेखी उत्तरातून विविध धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अप्पुघर हे सात एकर क्षेत्रफळावर विस्तारले आहे. प्रस्तावित राईड्स, मनोरंजन सुविधांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्याची माहिती महापालिकेकडे नाही. राईड्सची सुरक्षा तपासणी ऑडीट, विद्युत सुरक्षेबाबत व इतर आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रांची कोणतीही पूर्तता करण्यात आली नाही. प्रकल्पाचे काम सुरु करण्याची आणि पूर्ण करण्याची प्रस्तावित कालमर्यादा, सध्याच्या कामाच्या प्रगतीबाबतची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. प्रवेश, राईड शुल्काबाबत अद्याप कोणतेही धोरण निश्चित केले नाही. नागरिक, लहान मुले, पर्यटकांच्या सुरिक्षततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन सेवा, अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग आहे की नाही, याबाबतही माहिती उपलब्ध नसल्याचे महापालिका प्रशासनाने लेखी उत्तरात सांगितले आहे. या प्रकल्पामुळे इंदिरा गांधी उद्यान, दुर्गादेवी टेकडी परिसरातील पर्यावरण, वाहतूक व स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या संभाव परिणांबाबतचा कोणताही अभ्यास, अहवाल तयार करण्यात आला नसल्याने प्रशासनाने सांगितले. प्रशासनाकडे माहिती उपलब्ध नसतानाही प्रकल्प १५ वर्षांसाठी ठेकेदाराच्या घशात कशासाठी घातला असा संतप्त सवाल नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे.
अप्पूघरचे काम कधी पूर्ण होणार आहे. कामाची सद्यस्थिती याबाबतची कोणतीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. पर्यटकांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. प्रकल्पावार महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. असे असताना अप्पुघर १५ वर्षांसाठी ठेकेदाराला आंदण दिले आहे. सत्ताधारी आणि प्रशासन शहरातील पर्यटन स्थळाची वाट लावत आहेत.
- संदीप वाघेरे,
नगरसेवक




Total Users : 230868