spot_img
spot_img
spot_img

प्रभाग क्रमांक १६ मधील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा १ नोव्हेंबरला आंदोलन!

नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा महापालिका प्रशासनाला इशारा; पाणीपुरवठा आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा येत्या १ नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत विकासनगर, बापदेव नगर, दत्तनगर, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा परिसर, साईनगर तसेच मामुर्डी या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने, अपुरा आणि अनियमित होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्री. अजय सूर्यवंशी तसेच विद्युत विभागाचे सहशहर अभियंता श्री. कावळे यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

विशेषतः रावेत पंपिंग स्टेशन, सर्वे क्रमांक १६ येथे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक क्षमतेचा जनरेटर तातडीने खरेदी करून बसविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास पंपिंग प्रक्रिया ठप्प होऊन नागरिकांना पाण्याविना राहावे लागू नये, यासाठी कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

१ नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलन

पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जनरेटर खरेदी व बसविण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नागरिकांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही तरस यांनी स्पष्ट केले.

दिलेल्या मुदतीत ठोस कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाविरोधात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!