spot_img
spot_img
spot_img

‘वायसीएम’मध्ये स्वतंत्र ‘सेप्टिक ऑपरेशन थिएटर’ तातडीने सुरू करा!

 संसर्गग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सुविधेची गरज
आमदार महेश लांडगे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

संसर्गजन्य जखमा आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र ‘सेप्टिक ऑपरेशन थिएटर’ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरीसह कालबद्ध कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ४० लाखांच्या घरात पोहोचली असून, वाढत्या लोकसंख्येसोबत सार्वजनिक आरोग्यसेवेवरील ताणही वाढत आहे. सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वायसीएम रुग्णालय हा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे येथील उपचार सुविधा अधिक सक्षम आणि अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे लांडगे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनानुसार, वायसीएम रुग्णालयात संसर्गजन्य जखमा असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटरची आवश्यकता आहे. ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवावे लागते किंवा उपचारांना विलंब होतो. परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रवासाचा खर्च, आर्थिक भार आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. खासगी रुग्णालयांतील उपचार परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी ही परिस्थिती विशेषतः अडचणीची ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संसर्गजन्य जखमा, पूयुक्त किंवा खराब झालेल्या जखमा आणि शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारल्यास वायसीएममध्येच उपचार देणे शक्य होईल. तसेच संसर्ग नियंत्रण आणि इतर रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असे निवेदनात म्हटले आहे.

जागा, उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करा

स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटरसाठी आवश्यक जागा, उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि निधीचा तातडीने आढावा घेण्याची मागणी लांडगे यांनी केली आहे. संबंधित प्रस्तावास प्रशासकीय व आर्थिक मान्यता द्यावी. राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता असल्यास त्यासंबंधीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून निश्चित कालमर्यादेत ही सुविधा सुरू करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही सुविधा कार्यान्वित होईपर्यंत संबंधित रुग्णांच्या उपचारांत खंड पडू नये, यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना महापालिकेच्या रुग्णालयात वेळेत, परवडणारे आणि दर्जेदार उपचार मिळणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाला प्राधान्य देऊन आवश्यक कार्यवाही करावी. प्रस्तावाची सद्यस्थिती, अपेक्षित खर्च आणि सुविधा सुरू करण्याचे नियोजन याबाबतचा सविस्तर अहवाल आपल्या कार्यालयास सादर करावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

“आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये. वायसीएम हे सर्वसामान्य नागरिकांचे आधारस्थान आहे. संसर्गग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटर सुरू करून त्यांना वेळेत आणि सुरक्षित उपचार मिळावेत, ही आमची आग्रही भूमिका आहे. महापालिका प्रशासनाने आवश्यक निधी, उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करून ही सुविधा प्राधान्याने कार्यान्वित करावी. रुग्णांची धावपळ आणि कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू.”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!