दलित सेना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ताडीवाला रोड येथे आयोजन; सामाजिक व संसदीय कार्याला उजाळा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
दलित, शोषित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते, पद्मभूषण सन्मानित माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. दलित सेना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ताडीवाला रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रामविलास पासवान यांच्या प्रदीर्घ संसदीय आणि सामाजिक कार्याचे स्मरण करून त्यांच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला.
रामविलास पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टी आणि दलित सेनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील त्यांचे योगदान तसेच संसदीय राजकारणातील त्यांची भूमिका यांचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. समाजातील दुर्बल घटकांना न्याय आणि समान संधी मिळाव्यात, यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण उपस्थितांनी केले.
या अभिवादन सभेला ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मोहनराव वाडेकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा. विकास देशपांडे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंतराव साळवे, दिलीप जगताप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण, नितीन कांबळे, प्रीतम भोसले, राजू आल्हाट, सतीश बनसोडे, जनार्दन जगताप आणि महेश गायकवाड यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय संस्थेचे पदाधिकारी आणि अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे कार्यवाह-सचिव सुजित यादव यांनी केले. दलित सेना महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनील यादव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारीही पार पाडली.
रामविलास पासवान यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या सभेत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा, लोकशाही मूल्यांवरील विश्वासाचा आणि वंचितांच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाचा पुनरुच्चार करण्यात आला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत सामाजिक समता आणि न्यायासाठी कार्यरत राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.




Total Users : 238294