शबनम न्यूज | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, शेतीविषयी आवड निर्माण व्हावी आणि कृषी व्यवसायाची ओळख व्हावी, या उद्देशाने श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शेती क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी व्यावसायिक शिक्षण व स्काऊट उपक्रमांतर्गत आयोजित या परिसर सहलीत विद्यार्थ्यांनी विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतीविषयी माहिती जाणून घेतली.
श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या क्षेत्रभेटीसाठी संस्थेचे मानद सचिव अॅड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा आणि सहाय्यक सचिव प्रा. अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सोयाबीन, मिरची, भेंडी, गवार, वांगी, मुळा, मेथी, कोथिंबीर, शेवगा, पालक आणि टोमॅटो यांसारख्या विविध पिकांची पाहणी केली. पिकांची लागवड, त्यांचे प्रकार आणि शेतीतील विविध बाबी यांची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन घेतली. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतीचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली.
प्रशालेच्या पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना विविध पिकांची ओळख करून देत त्यांची माहिती समजावून सांगितली. प्रशालेचे प्राचार्य विक्रम काळे आणि उपमुख्याध्यापक हितेंद्र लोखंडे यांनी या क्षेत्रभेटीसाठी मार्गदर्शन केले तसेच उपक्रमात सहभाग घेतला.
या क्षेत्रभेटीत प्रशालेतील शिक्षक आव्हाड सर, दराडे सर, कु. सोनवणे मॅडम, सौ. शेटे मॅडम, सौ. धुमाळ मॅडम आणि सौ. शेळके मॅडम सहभागी झाले होते.
शेतीची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र बसून वनभोजनाचा आनंदही लुटला. प्रत्यक्ष निरीक्षण, निसर्गाशी जवळीक आणि सामूहिक सहभाग यांमुळे ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व आनंददायी ठरली.
व्यावसायिक शिक्षणांतर्गत आयोजित अशा क्षेत्रभेटींमुळे विद्यार्थ्यांना विविध व्यवसायांची ओळख होते. शेतीचे महत्त्व समजण्यासोबतच अन्ननिर्मितीची प्रक्रिया, शेतकऱ्यांचे कष्ट आणि निसर्गाचे महत्त्व यांविषयी जाणीव निर्माण होण्यास मदत होते. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे निरीक्षण कौशल्य विकसित होऊन शिक्षण अधिक अनुभवाधारित आणि आनंददायी बनते.




Total Users : 238294