spot_img
spot_img
spot_img

विनर्स अकादमीची मिळकत आळंदी नगरपरिषदेने केली सील

दिवेआगर दुर्घटनेनंतर शहरातील कोचिंग क्लासेसची तपासणी; आवश्यक परवानगी नसल्याचे निदर्शनास

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विनर्स अकादमीच्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी सुरू केली आहे. या पाहणीदरम्यान विनर्स अकादमीच्या इमारतीवर नगरपरिषदेने कारवाई करत अकादमीची मिळकत सील केली.

आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची जुना मिळकत क्रमांक ११३७, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले.

नगरपरिषदेच्या अभिलेखांची तपासणी केली असता संबंधित आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे लागू कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची संबंधित मिळकत सील करण्याची कारवाई केली. या वेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदी शहरातील कोचिंग क्लासेस व विविध आस्थापनांच्या परवानग्या, सुरक्षितता तसेच नियमांच्या पालनाबाबत प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या घेऊन कायदेशीर तरतुदींचे पालन करावे, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!