spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कूल इनोव्हेशन कौन्सिल’साठी थेरगावच्या पीएम श्री विद्यालयाची निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या Developing Innovation Culture and Entrepreneurship (DICE) in Schools या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचालित पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव या शाळेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निवड झालेल्या केवळ १० शाळांमध्ये या विद्यालयाचा समावेश झाल्याने महापालिका शिक्षण विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

DICE उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, सर्जनशील विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, डिझाईन थिंकिंग, उद्योजकता आणि प्रोटोटाइप निर्मिती यांसारखी कौशल्ये विकसित करणे हा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील विविध समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची आणि आपल्या कल्पनांचे प्रत्यक्ष नमुने अर्थात Proof of Concept/Prototype विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमासाठी JSPM कॉलेज, वाकड यांची HEI म्हणून तांत्रिक व मार्गदर्शक सहकार्याची जोड विद्यालयाला मिळणार आहे. JSPM कॉलेजच्या प्रा. दीपाली मगदूम या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देणे, प्रोटोटाइप विकसित करणे तसेच नवोपक्रमाच्या पुढील टप्प्यांसाठी आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

DICE अंतर्गत विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये उद्योजकीय कौशल्य विकास, क्षेत्रभेटी, कल्पना निर्मिती, Proof of Concept/Prototype विकास, स्टार्टअप इकोसिस्टम, Intellectual Property Rights (IPR) संदर्भातील मार्गदर्शन तसेच Demo Day आणि प्रदर्शन यांचा समावेश आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि JSPM कॉलेज, वाकड यांच्या सहकार्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निवडीमुळे थेरगाव परिसरातील विद्यार्थ्यांना ‘समस्या ओळखा, कल्पना सुचवा, नवोपक्रम करा आणि प्रोटोटाइप तयार करा’ या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

या उपक्रमाच्या समन्वयक प्रा. दीपाली मगदूम तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यालयाला भेट देऊन उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मुख्याध्यापक, शिक्षक व संबंधितांशी सविस्तर चर्चा केली.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या School Innovation Council अंतर्गत विद्यालयाची निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे आणि शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी आनंद व्यक्त करून विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

“ राष्ट्रीय स्तरावर स्कूल इनोव्हेशन कौन्सिल साठी पीएम श्री माध्यमिक विद्यालय थेरगावची निवड होणे हे महानगरपालिका शिक्षण विभागासाठी आत्यंतिक आनंद व अभिमानास्पद बाब आहे. JSPM कॉलेज च्या सहकार्याने विद्यार्थ्यामधील नवोपक्रम, कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेला चालना मिळेल. “

– ममता शिंदे उपायुक्त
शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!